भाजपमध्ये सातत्याने डावलले जात असलेल्या पंकजा मुंडे या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवत्ते, आमदार अमोल मिटकरी यांनी केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
पंकजा मुंडे यांना भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने नुकतीच मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. त्यावरून पंकजा यांच्याबद्दल भाजपबरोबरच राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
आता अमोल मिटकरी यांच्या विधानाने त्यात आणखी भर घातली आहे. पंकजा या राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडेच पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून पंकजा यांचा भाजपकडून सातत्याने अपमान केला जात आहे. पंकजा आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे साखर कारखान्याच्या निवडणुकीतही एकत्र आले होते.
त्यामुळे त्यांची राष्ट्रवादीशी होणारी जवळीक पाहून निश्चितच त्या राष्ट्रवादीत येतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे मिटकरी म्हणाले.
