पुण्यासह राज्यात पावसाने अखेर (Pune Weather Forecast) हजेरी लावली आहे. येत्या काही दिवसात मुसळधार पावसाठी शक्यता आहे. त्यामुळे पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी शहर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.
पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही भागात मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
मध्यम ते तीव्र आणि अगदी तीव्र पावसाच्या सरी येण्याच्या शक्यता असल्याने या पावसासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या काळात धुक्यामुळे त्रास होऊ शकतो आणि रस्ते निसरडे होऊ शकतात. ज्यामुळे खड्ड्यांची संख्या वाढू शकते. वाहन चालकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं, सावकाश वाहन चालवण्याचं आणि रहदारीच्या भागाकडे जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
‘घाटात जाताना खबरदारी घ्या’
पावसामुळे येत्या काही दिवसांत धुक्याचं प्रमाणदेखील वाढू शकतं त्यामुळे शहरालगच्या घाट असलेल्य़ा भागात जाणे टाळावे. या भागांमध्ये 30 ते 35 किमी प्रतितास वेगाने मध्यम जोरदार वाऱ्यांसह जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
घाटात खबरदारी बाळगण्याची गरज आहे. त्यात लोणावळा, खंडाळा, घिवशी, असनी माजई, आडोशी बोगदा, कार्ले, भाजे, दुधीवरे खिंड, उरसे खिंड, ताम्हिणी, मुळशी, लवासा, दासवे घाट, कडवे खिंड, पाबे घाट, कुरुंगवाडी, जांभळी, सिंहगड, कात्रज, माळीण, भोरगिरी, हडसर, कोल्हेवाडी, भुलेश्वर, पिंपळगाव जोगा, माळशेज घाट या घाटांचा समावेश आहे.
