अकोले – मान्सून राज्यात दाखल होऊन गेल्या तिन ते चार दिवसापासून तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे तालुक्यातील मुळानदीवरील अंबित धरण (ल. पा .तलाव) पूर्ण क्षमतेने भरुन ओहरफ्लोने विसर्ग मुळा नदीपात्रात सुरु झाला आहे.
एकूणच तालुक्यातील धरणे भरण्यास सुरुवात झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तर पाणलोट क्षेत्रातील गावात आदिवासी शेतकऱ्यांच्या भात लागवडीची लगबग सुरु झाली आहे.
बिपरजॅाय वादळानंतर राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. गेल्या तीन ते चार दिवसापासून अकोले तालुक्यातील हरिशचंद्र व मुळा परीसरात पाऊस सुरु असुन या पावसाने आज बुधवार २८ जुन रोजी दुपारी २ वा दरम्यान १९३.९७ द. ल. घ. फु. क्षमतेचे अंबित धरण (ल. पा. तलाव) पूर्ण क्षमतेने भरले आहे.
चालु वर्षी मान्सून उशिराने महाराष्ट्रात दाखल झालेला असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत हे धरण २० दिवस उशिराने भरले आहे. मागील वर्षी ९ जुन रोजी धरण भरले होते.
मात्र पाऊस सुरु होताच तिन ते चार दिवसांत अंबित धरण भरल्याने परिसरातील.आदिवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
