अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्याने नाशिक जिल्ह्यातही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा छगन भुजबळ समर्थपणे सांभाळत असताना विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांना या पदाची लॉटरी लागली. आता भुजबळांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्याने ते देखील पालकमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड काल अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. सर्वांचेच डोळे विस्फारले. राष्ट्रवादी फुटून अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्याला दोन मंत्री पदे मिळाल्याने भाजपमधील काही आमदारांची धाकधूकही या राजकीय घडामोडींनी वाढवली आहे.
राजकारणात काहीही होऊ शकते. याचा प्रत्यय राज्यातील एकूणच राजकारणांवरून येत आहे. सर्वसामान्यांच्या ध्यानी मध्ये नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी विद्यमान सरकारशी हात मिळवणी करत रविवारी मंत्रीपदाची शपथ ही घेतली. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री व नाशिकमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदाची सूत्रे पुन्हा छगन भुजबळांकडे जाणार अशा चर्चाना उधाण आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ पालकमंत्री असताना त्यांच्यात आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यात निधी वाटपावरून चांगलाच वाद रंगला होता. भुजबळाने आमचा निधी पळवल्याचा कांदे यांचा आरोप होता, हा वाद विकोपाला गेला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक दादा भुसे पालकमंत्री असून गेल्याच आठवड्यात निधी वाटपावरून भुजबळ यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता. त्यामुळे भुजबळ आणि भुसे यांच्यात देखील वादाची ठिणगी पडली आहे. आता नवीन राजकीय समीकरणात भुजबळांचं भुसे आणि कांदे एकाच सरकारमध्ये सामील झाल्याने निधी वाटपावरून उडालेल्या खरा जंगीच्या रूपांतर दिलजमाइत होणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
