कर्जत – दारू पिऊन झालेल्या बाप-लेकाच्या भांडणात बापाने मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत विमल रोहिदास लाढाणे (रा. डिकसळ, ता. कर्जत, जि. नगर) यांनी मिरजगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या प्रकरणी रोहिदास बापूराव लाढाणे (रा. डिकसळ, ता. कर्जत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मुलगा अमोल व पती रोहिदास हे दोघे दारू पिऊन येऊन घराच्या पत्र्याच्या पडवीत बसलेले असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
त्या वेळी त्यांना गप्प बसा, भांडण करू नका असे फिर्यादी व फिर्यादीची सून समजावून सांगत असतानाच फिर्यादीचा मुलगा अमोल याने आरोपी रोहिदास यांना शिवीगाळ केली व हाणामाऱ्या सुरू झाल्या. त्या हाणामारीत फिर्यादीचा मुलगा ओट्यावरून खाली पडला. ते पाहून आरोपीस मृत अमोल याने शिवीगाळ केली.
या कारणावरून रागाच्या भरात तिथेच पडलेले सिमेंट ब्लॉक उचलून आरोपी रोहिदास याने फिर्यादीचा मुलगा अमोल याच्या डोक्यात टाकला. पुन्हा सिमेंटचा दुसरा ब्लॉक उचलून तोंडावर टाकून त्याला जीवे ठार मारून त्याचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्यासह मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल माळशिखरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपी रोहिदास बापूराव लाढाणे याला मिरजगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे करत आहेत.
