Rain Upadate : पश्चिमी चक्रवाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. याच्या परिणामामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव, इगतपुरी, ठाणे, रायगड, पालघर, नगर, चाळीसगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती या भागासह उर्वरित ठिकाणी 8 मार्चपर्यंत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मि.मी. पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर काही भागांत 7 मार्चच्या आसपास गारपीट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हिमालयीन भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, या भागाकडून राज्याकडे जोरदार वारे वाहू लागले आहेत. तसेच आग्नेय आणि दक्षिण भागाकडूनदेखील राज्याकडे वारे वाहत आहेत.
त्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात रविवारपासून ते बुधवारपर्यंत गडगडाटांसह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची, तर मंगळवारी गारपिटीची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून दुपारच्या कमाल व पहाटेच्या किमान तापमानात घसरण होईल.
