सुजय विखे, शंकरराव गडाख, मोनिका राजळे यांच्यासह आठ जणांची बिनविरोध निवड; जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग
अहिल्यानगर (DSNews24) जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये शेवगाव सोसायटी मतदारसंघातून राजश्री घुले, पाथर्डी सोसायटी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे, राहाता सोसायटी मतदारसंघातून सुजय विखे, कोपरगाव सोसायटी मतदारसंघातून विवेक कोल्हे, नेवासा सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संगमनेर सोसायटी मतदारसंघातून रणजितसिंह देशमुख, श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघातून श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, तर बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप यांचा समावेश आहे.
बिनविरोध निवडणुकीसाठी प्रमुख नेत्यांचे प्रयत्न
दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची कामधेनू मानल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर २० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती.
या बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी खासदार सुजय विखे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांचे एकमत झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर आता आठ उमेदवार बिनविरोध झाल्याचे समोर आले आहे.
पुढील निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत आठ उमेदवार बिनविरोध झाल्याने उर्वरित जागांवरील निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय हालचालींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रमुख नेत्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणखी किती जागांवर बिनविरोध निवड होते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेल्या या निवडणुकीत कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे.
