अंकाई गडावर दर्शनासाठी गेले असताना हृदयविकाराचा झटका; राजकीय, सामाजिक व विधी क्षेत्रात हळहळ
संगमनेर (DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कायदा सेलचे जिल्हा संयोजक ॲड. अमित कोंडीभाऊ धुळगंड ( वय ४२) यांचे बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) सकाळी साडेआठच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या ऐतिहासिक अंकाई गडावर दर्शनासाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनामुळे मांडवे बुद्रुकसह संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. धुळगंड हे बुधवारी पहाटे अंकाई गडावर दर्शनासाठी गेले होते. गड चढून वर गेल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत त्यांचे निधन झाले.
ॲड. अमित धुळगंड हे गेल्या अनेक वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत होते. भारतीय जनता पक्षाच्या कायदा सेलचे जिल्हा संयोजक म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख होती.
विधी क्षेत्रातील कामासोबतच त्यांना सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष रुची होती. विविध क्षेत्रांतील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क होता. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने मित्रपरिवार, राजकीय सहकारी आणि परिचितांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
ॲड. अमित धुळगंड यांच्या निधनाने मांडवे बुद्रुक परिसराने एक सक्रिय विधिज्ञ आणि राजकीय कार्यकर्ता गमावला आहे.
