संगमनेर (DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागासाठी गेल्या वर्षभराचा काळ राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या वेदनादायी ठरला आहे. भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या राजकीय वर्तुळातील तीन निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे अकाली निधन झाल्याने पठार भागाने आपले महत्त्वाचे शिलेदार गमावले आहेत. भाजपचे नेते बुवाजी पा. खेमनर, भाजपा ओबीसी मोर्चाचे संगमनेर पूर्व मंडळाध्यक्ष सुभाष रामदास भुजबळ आणि भाजपच्या कायदा सेलचे जिल्हा संयोजक ॲड. अमित धुळगंड यांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
बुवाजी खेमनर यांच्या निधनाची सल कायम
गेल्या वर्षी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी भाजपचे नेते बुवाजी पा. खेमनर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच साकूर पठार भागावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पक्षासाठी काम करणारे आणि परिसरातील राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय असलेले नेतृत्व हरपल्याची भावना त्यावेळी व्यक्त झाली होती. त्यांच्या निधनाची सल कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम आहे.
बरोबर वर्षभरानंतर सुभाष भुजबळ यांना काळाने हिरावले
बुवाजी खेमनर यांच्या निधनाच्या तारखेलाच, म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी, भाजपा ओबीसी मोर्चाचे संगमनेर पूर्व मंडळाध्यक्ष सुभाष रामदास भुजबळ यांचेही दुःखद निधन झाले. पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने साकूरसह संपूर्ण पठार भागात शोककळा पसरली.
ॲड. अमित धुळगंड यांच्या निधनाने पुन्हा मोठा धक्का
या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी मांडवे बुद्रुक येथील भाजपच्या कायदा सेलचे जिल्हा संयोजक ॲड. अमित धुळगंड यांच्या निधनाची बातमी समोर आली. नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या ऐतिहासिक अंकाई गडावर सहकाऱ्यांसोबत दर्शनासाठी गेले असताना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
कायदा क्षेत्रासह राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या ॲड. धुळगंड यांच्या अकाली निधनाने मांडवे बुद्रुकसह संपूर्ण संगमनेर तालुक्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
तीन नेतृत्वांचे जाणे, महायुतीसाठी मोठी पोकळी
बुवाजी खेमनर, सुभाष भुजबळ आणि ॲड. अमित धुळगंड हे तिघेही पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारे पदाधिकारी म्हणून ओळखले जात होते. वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपच्या संघटनात्मक कार्यात योगदान दिले होते. मात्र, वर्षभराच्या कालावधीत या तिन्ही पदाधिकाऱ्यांचे निधन झाल्याने साकूर पठार भागातील महायुतीच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजकारणात पदे आणि जबाबदाऱ्या बदलत असतात; मात्र संघटनेसाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जागा भरून काढणे कठीण असते. तीन निष्ठावंत शिलेदारांच्या अकाली एक्झिटमुळे पठार भागातील भाजपसह महायुतीच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या आठवणी आणि पक्षासाठीचे योगदान कार्यकर्त्यांच्या स्मरणात कायम राहणार आहे.
