तलाठी भरती परीक्षेला राज्यातील तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. याआधी अनेक तरुण आजही अर्ज करत आहेत. दरम्यान परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानपरीषदेत केली. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै होती.
या प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे.
तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे पण नेमकी किती तारखेपर्यंत ही मुदतवाढ असेल हे स्पष्ट करण्यात आले नाही. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे.
तलाठी भरती अर्ज प्रक्रियेची पुन्हा एकदा मुदत वाढविण्याची विनंती महसुल मंत्र्यांनी केली होती. त्यानुसार याला मुदतवाढ देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
