मुंबई – बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात आता मान्सून आणखी दमदारपणे कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणासह, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा “रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, राज्यातील तुरळक भाग वगळता बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोकणात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा “यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येथे विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रेड अलर्ट :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.
ऑरेंज अलर्ट :
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.
येलो अलर्ट :
जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर.
