बसमध्ये चढताना तोल गेल्याने चाकाखाली सापडून एक महिला जागीच ठार झाली. संगमनेर बस स्थानकात गुरूवार (दि. 10) रोजी दुपारी ही हृदय पिळवटणारा थरार घडल्याने हळ-हळ व्यक्त होत आहे.
आयशा बेग (वय 55 वर्षे, रा. संगमनेर खुर्द) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिन्नर एसटी डेपोची नाशिक- नगर बस (क्रमांक एम एच 20 बी एल 4056) गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास संगमनेर बस स्थानकात आली.
बस पुन्हा अ. नगरकडे जाण्यास निघाली असता बसमध्ये आयशा मुनी बेग ही महिला चढत होती, मात्र अचानक बस सुरू झाल्याने चढताना महिलेचा तोल गेल्याने ती चाकाखाली सापडून जागीच ठार झाली.
आजूबाजूच्या नागरिकांनी ही दुर्घटना पहाताच आरडा- ओरड केल्याने चालकाला महिला बसच्या चाकाखाली गेल्याची घटना लक्षात आली. बसभोवती प्रवाशी नागरिक, पोलिस व बस कर्मचारी गोळा झाले.
या अपघातामुळे चालक घाबरला. तो बसस्थानकात पळाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रूग्णवाहिका बोलावून मृतदेह रुग्णालयात हलविला. याबाबत संगमनेर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
