राहुरी : आदिवासी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कोळेवाडी येथे श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन शिबिर आयोजित करत जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोळेवाडी, आंबेकरवस्ती, कोकाटेवस्ती, लेंभेवस्ती या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल आणि वह्यांचे वाटप राहुरी कृषी विद्यापीठाचे किटकशास्रज्ञ चांगदेव वायळ आणि सेंट्रल रेल्वे अधिकारी जयराम नंदकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे बघायला मिळाले.
त्याचबरोबर परिसरात सद्यस्थितीत साथीचे आजार बघायला मिळत असल्याने नागरिकांची संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.पुनम घिगे यांनी रूग्णांची आरोग्य तपासणी केली. तपासणी केलेल्या रूग्णांना मोफत गोळ्या औषधे देण्यात आली.
तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिराचा ठेवुन नागरिकांना माहिती देण्यात आली.” लोकांचे हित हाच आमचा ध्यास” असे या संस्थेचे ब्रीद वाक्य सार्थक होताना दिसत आहे. कोळेवाडी गावात या संस्थेचा पहिलाच सामाजिक कार्यक्रम होता.
उपक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष लहानु वायळ, संस्थेचे सचिव भाऊसाहेब पारधी, उपाध्यक्ष भिमराज आंबेकर, सदस्य सावळेराम आंबेकर, योगिता वायळ, सोमनाथ कोरडे, गोविंद कोरडे यांनी अतिशय परिश्रम करून नियोजन केले. संस्थेने राबविलेल्या उपक्रमांच विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी युवा नेते रावसाहेब कांबळे, रविंद्र तळपे, राजू आंबेकर, सागर नवले, लालु कोरडे, अंगणवाडी सेविका शांता पारधी, चंद्रकला वायळ, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव भाऊसाहेब पारधी तथा उपाध्यक्ष यांनी केले तर सुत्रसंचलन योगिता वायळ व आभार गोविंद कोरडे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
