Rain Upadate : संगमनेर : विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने सोमवारी रात्री साकूरसह परिसरात थैमान घातले. त्यामुळे परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला होता. रविवारी रात्री बिरेवाडीत गारपीट झाली होती. तसेच सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक साकूरसह परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने थैमान घातल्याने परिसरात एकच धावपळ उडाली.
तसेच होळीचा सण असल्याने परिसरात गावोगावी होळी साजरी करण्याची तयारी नागरिकांनी केली होती. मात्र जोरदार वाऱ्यासह पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. तसेच विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अवकाळी पावसाने परिसरातील मका, गहू, कांदा आदि पिकांचे नुकसान झाले आहे.
सद्यस्थितीत शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांवर संकट उभे राहिले आहे. जांबुत परिसरात गारपीट झाली आहे.
