अहमदनगर हादरले… पतीने पत्नी आणि सासूची केली हत्या

कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील राहुरी तालुक्यात घडलीय. मध्यरात्री झोपेत असताना डोक्यात लोखंडी पहार घालून हत्या केली. या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील कात्रड गावात एकच खळबळ उडाली आहे.

नूतन सागर साबळे आणि सासू सुरेखा दिलीप दांगट अशी मयत माय-लेकींची नावे आहेत. हत्येनंतर आरोपी पती फरार झाला आहे. सागर सुरेश साबळे असे फरार आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सागर साबळे याचा पत्नी आणि सासूसोबत काही कारणातून वाद होता. वाद विकोपाला गेला. याच रागातून सागरने मध्यरात्री झोपेत असताना सासू आणि पत्नीच्या डोक्यात लोखंडी पहार घालून त्यांची हत्या केली.

हत्येनंतर सागर पळून गेला. सकाळी सागरचा भाऊ उठला तर वहिनी आणि तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीत नेमका काय वाद होता, याचाही पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment