शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, नगर दक्षिणेत विखेंचा पराभव करायचा… उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक

शिर्डी लोकसभा मतदारसंघातू ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव ठाकरे गटाकडून पुढे आलं आहे.

तसेच नगरची जागा काहीही करून जिंकायचीच आहे, त्यामुळे तयारीला लागा असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांच्या दुसऱ्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी, अहमदनगर, नाशिक आणि दिंडोरी या चार मतदारसंघाचा आढावा घेतला. या चार लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचं आव्हान कसं उभं करायचं यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात स्थानिक नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनीच व्यक्त केली. नगर लोकसभा आपल्याला जिंकायचीच आहे, असा निर्धार आढावा बैठकीत करण्यात आला.

विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांचा आपल्याला पराभव करायचा आहे, त्यासाठी तयारीला लागा. महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असो, एकत्र मिळून निवडणूक लढा आणि त्या उमेदवाराची साथ द्या, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

Leave a Comment