भांडूप : मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यात दरड कोसळण्याची शक्यता असणारे अनेक ठिकाण असून तेथील झोपडपट्ट्यांच्या संरक्षणासाठी आधार भिंत बांधण्यात येतात,परंतु अनेक भिंती जीर्ण झाल्या असून कोसळण्याच्या अवस्थेत आहेतं याआधी देखील या भिंती कोसळून अनेक वेळा जीवित हानी झालेली आहे.
वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी आधार भिंती संदर्भात प्रशासनाशी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील प्रशासन मात्र मुंबईकरांच्या सुरक्षित जिवाबाबत प्रचंड उदासीन असल्याचे दिसते. असे असताना मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी वंचितच्या स्नेहल सोहनी भांडुप एस वॉर्ड येथे उपोषणास बसल्या होत्या.
यात प्रामुख्याने मुंबईतील सर्व जीर्ण आणि धोकादायक भिंतीचे बांधकाम तातडीने करावे व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, खाजगी-शासकीय असा भेद न करता सरसकट भिंतीचे बांधकाम हाती घ्यावे, झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट व उच्चस्तरीय चौकशी करावी,
आयआयटी मुंबई यांच्या सूचनेनुसार शासनाने यावर ठोस कृती कार्यक्रम निर्धारित करून होणारे अपघात रोखावेत. व नागरिकांचे पुनर्वसन SRA योजने अंतर्गत करण्यात यावे इत्यादी मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या आहेत.
यावेळी उपोषणस्थळी वंचितचे युवा नेते मा. सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. सहाय्यक आयुक्त यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांना पुढच्या सोमवारपर्यंत आमच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्य करून देण्यात याव्यात असे सांगण्यात आले. पुढच्या सोमवारपर्यंत विषय मार्गी न लागल्यास पुढचे उपोषणाचे आंदोलन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर होईल असा इशारा सूजात आंबेडकर यांनी दिला.
सुजात आंबेडकर यांच्या हस्ते ज्यूस पिऊन स्नेहल सोहनी यांनी उपोषण मागे घेतले. ३ दिवसाचा अल्टिमेट देऊन तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान, महिला आघाडी मुंबई अध्यक्ष सुनीता ताई गायकवाड, युवा अध्यक्ष परमेश्वर रणशुर यांच्या सहित मुंबई, जिल्हा,तालुका ,वार्डचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शेकडो जण उपस्थित होते
