Maharashtra Unseasonal Rain News: राज्यामध्ये (Maharashtra News) अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) पिकांना फटका बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, राज्यभरात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीनं महसूल यंत्रणेनं लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे.
मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
