संगमनेर – तालुक्यातील साकूर येथील रऊफ शेख यांच्या वाढदिवसानिमित बुधवार दि. 8 मार्च रोजी स.10 वा. ग्रामसचिवालय,साकूर या ठिकाणी दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेर व रऊफ शेख मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रविकार तपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये मोतीबिंदु तसेच पडदा इ.नेत्रविकार असणार्या रुग्णांना लगेचच त्याच दिवशी संगमनेर येथे दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय,संगमनेर येथे दाखल करुन दुसर्या दिवशी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
दरम्यान, साकूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व. अब्बास पटेल यांचे निधन झाले आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त कोणताही सत्कार, केक, हार, बुके, शाल स्वीकारणार नसल्याचा निर्णय रऊफ शेख यांनी घेतला आहे. उलट याऐवजी जास्तीत जास्त गरजुवंत रुग्णांना शिबीराचा लाभ मिळवुन द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
रऊफ शेख मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी या शिबीराचे आयोजन केले जाते. अशा सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याच्या रऊफ शेख यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
