भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख ‘लांडगा’ असा केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर चौफेर सडकून टीका करण्यात येत आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी पडळकरांविरोधात अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी आंदोलनही केली आहेत. आता पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा, अशी घोषणा अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहरांध्यक्षांनी केली आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, “पडळकर दिसतील तिथे भर चौकात जोड्यानं मारा. नंतर पडळकरांना काळं फासून नागपूरला येत एक लाख मिळवा. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करत आहे.”
“पडळकरांची जागा दाखवल्याशिवाय ते सुधारणार नाहीत. नागपूरला आल्यावर पडळकरांना सोडणार नाही. पडळकरांनी नागपूरला येऊ नये. आल्यावर मार खाल्याशिवाय जाणार नाहीत,” असा इशारा प्रशांत पवारांनी पडळकरांना दिला आहे.
