शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट 

महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आलीये. सुप्रीम कोर्टाने वेगाने सुनावणी घेण्यास सांगितल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे.

त्याबद्दलची तारीख शिवसेनेच्या संबंधित आमदारांना कळवण्यात आली असून, विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीस हजर राहण्यासंदर्भातील नोटीस बजावली आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सुनावणीचे वेळापत्रक मागितलं असून, सुनावणी वेगाने घेण्यास सांगितलं आहे.

विधानसभा अध्यक्षांची दिल्लीवारी

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला गेले होतो. दिल्लीतून परतल्यानंतर विधिमंडळाकडून आज सुनावणीबद्दल माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेच्या संबंधित आमदारांना याबद्दल कळवण्यात आले असून, सुनावणीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

विधिमंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर रोजी दुपारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार असून, त्यास हजर राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. असं असलं तरी सुनावणीचं वेळापत्रक विधिमंडळाकडून पाठवण्यात आलेलं नाही.

Leave a Comment