नागपूर : विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भात सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली असून, ही तूट सध्या पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, २ ते ५ सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट
नागपूर हवामान विभागाने २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ४ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या दिवशी काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, यंदा ऑगस्ट महिन्यात विदर्भात पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राहिले. अनेक भागांत पावसाअभावी शेतीसमोरील संकट अधिक गंभीर झाले आहे. खरीप पिकांना सध्या पाण्याची मोठी गरज असून, पावसाची तूट कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत होणारा पाऊस ही तूट कितपत भरून काढतो, याकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
एल निनोचा प्रभाव?
दरम्यान, जागतिक हवामानातील बदलत्या परिस्थितीचा पावसावर परिणाम होत असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या वितरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भात सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पाऊस होईलच, अशी स्थिती सध्या दिसत नाही.
राज्यातही पावसाची तूट
यंदा ऑगस्ट महिन्यात केवळ विदर्भातच नव्हे, तर राज्यातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मराठवाड्यात सुमारे ६९ टक्के, विदर्भात ५८ टक्के, तर संपूर्ण राज्यात सरासरी ४६ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, आता सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
