Iraq Fire Accident: इराकमध्येलग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत 100 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहे. उत्तर इराकच्या (Iraq) के नेवेहमधील (Nineveh) अल-हमदानिया भागात ही दुर्घटना घडली आहे.
नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास 335 किलोमीटर अंतरावर आहे. इराकी वृत्तसंस्था नीना यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण आगीत वधू वराचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप आगीचे कारण समोर आलेले नाही.
दरम्यान समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार फटाक्यांमुळे ही आग लागली आहे. इराकी वृत्तसंस्था नीनाने या आगीच्या दृश्यांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये फायरफायटर आग विझवण्याचे काम करत आहे. तसेच सोशल मीडिया आणि स्थानिक पत्रकारांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये लग्नसोहळ्याच्या हॉलचे फोटो टाकण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण हॉल जळून खाक झाला आहे.
इराकी वृत्तसंस्था नीनाच्या हवाल्यानुसार विवाहस्थळी असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका झाला आहे. इराकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला. तसेच हॉलच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य सुमार दर्जाचे असल्याने काही मिनिटातच आगीमुळे हॉलचा काही भाग कोसळला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वार्ताहराने घटनास्थळी चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान वाचलेल्यांच्या शोधात इमारतीच्या ढिगाऱ्यावर चढताना दिसत आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीं आणि आगीतून वाचलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीला आग स्थानिक वेळेनुसार 10:45 च्या सुमारास लागली. त्यावेळी शेकडो लोक लग्नमंडपात लग्नसोहळा साजरा करत होते. अधिकृत निवेदनानुसार इराकी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके पाठवली आहेत.तसेच जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
