संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथून एक मोठी बातमी समोर आलीय. बिरेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निलम ढेंबरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिलाय. ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत त्यांच्या राजीनामा पत्राची पडताळणी करण्यात आलीय.
गेल्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत ९ पैकी ६ जागांवर विजय मिळवत बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या चाव्या कॉंग्रेसने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत.
दरम्यान या पक्षाच्या विचारानूसार सरपंच पदाचा कालावधी वाटून घेतला आहे. या वाटपानुसार एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निलम ढेंबरे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा ३१ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला होता.
गटविकास अधिकाऱ्यांनी राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायतीकडे पाठविल्यानंतर बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये ढेंबरे यांनी राजीनामा दिल्याचे सिद्ध झाले आहे. यावेळी उपसरपंच अण्णा कढणे, ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांसह अन्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, सरपंचपदाचा राजीनामा सिद्ध झाल्याने सरपंच पदाची जागा रिक्त झाली असून नवीन सरपंच निवड होईपर्यंत सरपंचपदाच्या कार्यभाराची जबाबदारी उपसरपंच अण्णा कढणे बघणार आहे. तसेच नवीन सरपंच पदाची निवड कधी होणार आता याकडेच बिरेवाडीकरांचे लक्ष लागले आहे.
