संगमनेर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत २ कोटी १६ लाख ६१ हजार ९१६ रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार सहा वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. या अपहराप्रकरणी तत्कालीन चेअरमनवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करण्यात आला होता.
परंतु आमच्या ठेवी आम्हाला परत द्या यासाठी ठेविदार भिमराज जाधव, विकास पवार, बबन सानप, गुणाजी उर्फ गुणवंत हजारे या मोजक्या ठेवीदारांनी यासाठी लढाई सुरू ठेवली होती. तसेच उपोषण करत आवाज देखील उठवला होता. यामुळे साईबाबा पतसंस्थेचे नाव संपुर्ण नगर जिल्ह्यात चर्चेला आला होता. परंतु म्हणतात ना शेवटपर्यंत लढाई केल्यास यश नक्कीच मिळते. हीच जिकरीची लढाई शेवट पर्यंत चौघा ठेवीदारांनी लढली आणि यश मिळाले आहे.
दरम्यान, पतसंस्थेच्या संचालक मंडळावर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक मंचाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. दोन्हीही बाजू ऐकून घेत अहमदनगर येथील ग्राहक मंचाने ठेविदारांच्या बाजूने निर्णय दिला असल्याची माहिती समोर आलीय. संचालक मंडळाला ठेविदारांच्या ठेवी व्याजासह ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेशीत केले असून या बरोबर ठेविदारांना झालेला मानसिक त्रास बघता नुकसान भरपाई म्हणून दीड लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळावर न्यायालयाने हि जबाबदारी टाकली आहे. जर ३० दिवसांच्या आत ठेविदार भिमराज जाधव, विकास पवार, बबन सानप, गुणाजी उर्फ गुणवंत हजारे यांच्या ठेवी व्याजासह अदा केल्या नाही तर कंटेम्पट ऑफ कोर्टनुसार कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. सदर ठेविदारांच्या बाजूने ॲड.पाटोळे यांनी काम पाहिले आहे. न्याय मिळवून दिल्याने सदर ठेविदारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळ या आदेशाचे दिलेल्या मुदतीत पालन करते का कारवाईला सामोरे जाणार? आता हे लवकरच समजणार आहे.
