नाशिक – पुणे महामार्गावर बसला आग

नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर-नाशिक बसला अकस्मात आग लागल्यानंतर चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे १५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इंजिनमधून धूर येऊन ही बस पेटली. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले. शिंदे टोल नाक्याजवळ ही घटना घडली.

नाशिक जिल्ह्यात याआधी राज्य परिवहन मंडळाच्या बस पेटण्याच्या घटना घडल्या आहेत. सोलापूर-नाशिक ही नाशिक आगार क्रमांक एकची बस आहे. शुक्रवारी चालक विलास चोले आणि वाहक संदीप मोरे हे बसवर कार्यरत होते. सोलापूरहून बस नाशिककडे येत होती. बसमध्ये १५ प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण १७ जण होते. सिन्नर सोडल्यानंतर बस नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर आली.

नाशिक शहराजवळच हा टोल नाका आहे. टोल नाका ओलांडल्यानंतर बसच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे चालक चोले यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बस रस्त्याच्या बाजुला नेली. प्रवाशांना तातडीने खाली उतरविले. इंजिनच्या ज्या भागातून धूर येत होता, त्यावर अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास यश आले नाही. काही वेळात बसने पेट घेतला. ती आगीच्या विळख्यात सापडली.

या घटनेची माहिती मिळताच सिन्नर एमआयडीसी आणि नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एसटीचे जिल्हा वाहतूक अधिकारी किरण भोसले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बसच्या टाकीत इंधन होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे इंधन टाकी व टायर सुरक्षित राहिले. मात्र आग नियंत्रणात येईपर्यंत आसन व्यवस्था, वायरिंग व वरील सांगाडा भस्मसात झाला.

Leave a Comment