काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यासह काही बडे नेते बाहेर पडल्यामुळे राष्ट्र्वादीत मोठी फुट पडली आहे. त्यानंतर आता पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटात निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरु आहे.
अशातच आता निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार उद्या म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाकडे संघटन कुणाचे याबाबत म्हणणे मांडले जाणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांना निवडणूक आयोगासमोर हजर राहावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) फुटीनंतर निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडत पक्षावर दावा केला आहे. यासंदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. यानंतर आता दोन्ही गटाच्या नेत्यांना निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहावे लागणार आहे.
तर दुसरीकडे शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात असून त्यांच्या गटाच्या वतीने वकिल अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार आहेत. तसेच शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे ८ ते ९ हजार शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय आज शरद पवार यांनी दिल्लीत विस्तारीत कार्यसमितीची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत जर निवडणूक चिन्ह गोठवले गेले, जर आपल्या विरोधात काही निर्णय आला तर पुढची रणनीती काय असेल यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे
