राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप आणि राज्यातील पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी यामुळे मिळणारा अपुरा वेळ विचारात घेऊन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
अजितदादा हे बारामती तालुका ‘अ’ वर्ग मतदार संघातून बॅंकेवर गेली 32 वर्षे प्रतिनिधीत्व करीत होते.
अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 1991 पासून बॅंकेने नेत्रदिपक आर्थिक प्रगती केली असून त्यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील देशातील नंबर 1 ची बॅंक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने नावलौकिक मिळवलेला आहे.
एवढेच नव्हेतर शेडयूल्ड अर्बन को. ऑपरेटिव्ह बॅंकांचा दर्जा असणाऱ्या व ज्यांचे कार्यक्षेत्र संपुर्ण देशभर आहे अशा 53 शेडयूल्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकांमध्ये एकाच जिल्हयाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने बहुतांश निकषांमध्ये पहिल्या5 बॅंकांमध्ये स्थान मिळवले आहे.
