तर सरकार पडेल, दिलीप वळसे पाटलांचा इशारा……

आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वेगवेगळ्या समाजांमधून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे, तर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगरांना एसटीचं आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे.

मराठा समाज आणि धनगर समाजाच्या या मागणीला ओबीसी आणि आदिवासी समाजाकडून विरोध करण्यात येत आहे, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी आरक्षणाला धक्का लावू नये. देशात आदिवासी खासदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे केंद्र सरकार पडू शकतं, असं वक्तव्य सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षण देताना पुर्वीच्या आरक्षणाला धक्का न लावता, स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी मागणीही वळसे पाटील यांनी केली आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या या इशाऱ्यावर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे. वळसे पाटील काय म्हणाले माहिती नाही, पण धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार गंभीर असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

आरक्षणाचा निर्णय होणार आहे, त्याआधीच सरकार वेगवेगळ्या सवलती त्या त्या समाजाला देत आहे. महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री फेसबुकवर होते, त्यांचे मंत्री कुठे होते माहिती नाही, त्यांच्या राजकीय इच्छाशक्ती अभावी आरक्षण गेलं, त्याचं पाप आता महाराष्ट्र भोगतोय, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.

Leave a Comment