राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच, पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजांसह पावसाचा अंदाज आहे.
तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनने देशाच्या निरोप घेतला असून, दोन ते तीन दिवसात दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होण्याची शक्यता आहे. राजस्थान, हरियानामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. अंदमान समुद्रातील चक्राकार वाऱ्यांपासून ते श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरला आहे.
आज (ता. २०) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानसह, उन्हाचा चटका कायम राहण्याची अंदाज आहे.
