राज्यात वाढलेला ऑक्टोबर हीटचा चटका कमी होऊ लागल्याने कमाल तापमानात घट झाली आहे. यातच किमान तापमानात घट होत असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. सोमवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) दाखल झाले असतानाच, राज्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली.
ढगाळ हवामानामुळे राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढलेले कमाल तापमान कमी झाले. ३७ अंशांच्या पार गेलेला तापमानाचा पारा पुन्हा ३५ अंशाच्या खाली घसरू लागल्याने उन्हाची ताप कमी होऊ लागली आहे.
रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईतील सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यातच किमान तापमानात घट होऊ लागली असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १८ अंशांच्या खाली आला आहे. जळगाव येथे राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडी हळूहळू वाढत जाणार आहे.
