आमचे सरकार आल्यानंतर तुम्हालाही उलटे टांगणार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

दादरमधील शिवाजी पार्कवर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका केली. शिवसेनेतील बंडखोरी ते मराठा आंदोलनपर्यंत झालेल्या घडामोडींवरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले…

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला घराणेशाही मान्य आहे. कोरोना काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी हे काम केले आहे. त्यामुळे मी राज्याचा कुटुंब प्रमुख झालो. ज्यांच्या मागे पुढे कोणी नाही, त्यांच्या हातात देश दिला तर त्याचा जर्मनी होतो.

नरेंद्र मोदी आल्यानंतर स्थैर्य येईल असे वाटले होते. मात्र आता काय चाललंय ते आपण पाहतच आहोत. कुठलेही प्रश्न सुटलेले नाहीत. उद्या सरकार आपले येणार आहे. सरकार आणणार म्हणजे आणणारच. त्रास देणे थांबवले नाही तर आमचे सरकार आल्यानंतर तुम्हालाही उलटे टांगणार, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

ते पुढे म्हणाले की, सरकार आल्या-आल्या मेट्रो आणि बुलेट ट्रेनची जागा सांभाळली. ती लगेच देऊन टाकली. बुलेट ट्रेन गद्दारांना सुरतला नेण्यासाठी सुरु करत आहेत. मुंबई तोडून दिल्लीच्या दरवाजात उभी करण्याचा डाव आहे. मुंबई तोडण्याचा प्रयत्न झाला तर तुमचे सरकार जाळून टाकेन, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

हिंमत असेल तर पीएम फंडपासून काश्मीरपर्यंत चौकशी करा. आम्ही मुंबई वाचवल्याचा अभिमान बोलून दाखवत नाही. उलट मुंबईची बदनामी करत आहात, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Comment