पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाने होणार आहे. मोदी तिसऱ्यांदा साईबाबांचं दर्शन घेणार आहेत.
यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतील..
2018 मध्ये साईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष होतं. या सोहळ्याची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातानुकुलित दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन करण्यात आलं होतं. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेच लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.
आज दुपारी 1च्या सुमारास मोदी साई मंदिरात पोहोचतील. साई मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांच्या हस्ते पाद्य पूजा होईल. त्याचबरोबर शिर्डी माझे पंढरपुर ही छोटेखानी आरती सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
यानंतर साईबाबा संस्थानच्या 2024 च्या डायरीचा प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या ठिकाणाहून दर्शन घेतल्यानंतर ते अकोले तालुक्यातील निळवंडेकडे रवाना होतील.
