पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज शिर्डी दौऱ्यावर आहे. यावेळी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरणाची पाहणी केली. शिर्डी (Shirdi) जवळील काकडी विमानतळ लगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी आरोग्य, रेल्वे, रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत.
अकोले तालुक्यातील निळवंडे धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 68,878 हेक्टर (1 लाख 70 हजार 200 एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे.
सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील 2612 हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील 66,266 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.
