महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये ‘मुख्यमंत्री’ पदावरून रस्सीखेच सुरु आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कधी एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. तर कधी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे समर्थक अजितदादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावतांना पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे यात भाजप देखील मागे नसून नुकतेच महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,’ अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अशातच आता अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी “लवकरच अजितदादा मुख्यमंत्री होतील, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे”, असे विधान केले आहे. ते नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
यावेळी बोलतांना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, ‘मी पुन्हा येईन…’ हे भारतीय जनता पक्षाने केलेले ट्विट त्यांनी नंतर डिलीट केले आहे. त्यामुळे त्यावर आता बोलण्यात काही अर्थ नाही, पण अजितदादा मुख्यमंत्री होतील, याची मला खात्री आहे. अजित पवार पुढील काळात महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. २०२४च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ९० जागा मागण्याचे आमचे ठरले आहे. पुढे ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि निर्णय काय होतो, हे बघावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमचे सरकार चांगले सुरू आहे. सध्या यात काहीही बदल होणार नाही. मात्र, पुढील मुख्यमंत्री अजितदादा व्हावे, अशी आमचा भूमिका आहे, असेही मंत्री आत्राम यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र भ्रमणावर निघाल्यानंतर अजित पवारांचा विदर्भात देखील दौरा होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. विदर्भात पक्ष वाढेल याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते बसून ठरवतील की, मुख्यमंत्री कोण होणार. तडफदारीने काम करणारा नेता म्हणून अजित पवारांकडे बघितले जाते. त्यांच्याकडे मोठा अनुभव असल्याने दादांना मुख्यमंत्री करावे, असे माझे मत आहे, असेही अत्राम यांनी
