संगमनेर : बिरेवाडीत राज्य सरकारची काढली अंत्ययात्रा 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ देऊनही राज्य सरकार मराठा समाजाला नुसते खोटेनाटे सांगून मराठा समाजाला झुलवत ठेवत असल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभाग सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी (दि. २९) राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन अंत्यविधी करुन राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी साकूर पठारभागातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते साकूर जवळील बिरेवाडी येथे एकत्र आले होते. त्यानंतर बिरेवाडी येथील हनुमान मंदिरापासून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

हि प्रतिकारात्मक अंत्ययात्रा बिरेवाडी गावठाणातील स्मशानभूमीत नेत हिंदु रुढीपरंपरेनुसार अंत्ययात्रेचा अंत्यविधी करण्यात आला. तसेच यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पठारभागाच्या विविध गावांमधील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. या 40 दिवसात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अन् आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केली.

पण सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय आला नाही. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यांना यावेळी साकूर पठारभाग सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाकडून तीव्र स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पुढील दोन दिवसांत आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे यावेळी साकूर पठारभाग सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी बिरेवाडी ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत तोपर्यंत राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात नो एंट्री असणार आहे. तसेच गावातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment