जुन्या पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मुद्द्यावरुन राज्यातील तब्बल 14 लाख कर्मचारी (Maharashtra Government Employees) संपावर ठाम आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संटनेने याबद्दल इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या 14 मार्चला 14 लाख कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, संप नको, सर्व कर्मचारी, संघटनांशी चर्चेला तयार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत म्हणाले आहेत. जुनी पेन्शन योजना घाईने नव्हे तर विचारपूर्वक घेण्याचा निर्णय आहे, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.
“याबाबत मोठ्या प्रमाणात आपच चर्चा घडवली पाहिजे. मी पूर्ण दिवस, फक्त एक नाही, तर चार दिवस लागले तरी सर्व कर्मचारी युनियनसोबत बोलायला तयार आहे.
मी कर्मचारी संघटनांना विनंती करणार आहे की, त्यांनी इगो इशू न करता यावर चर्चेच्या माध्यमातून काय टप्पे ठरु शकतात, काय मार्ग निघू शकतो यावर मार्ग काढूया. संपाची नोटीस दिलीय, आपण सगळ्यांनी विनंती केली पाहिजे की, संपावर जाऊ नका”, असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.
