श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासमोर केलेले धमाकेदार भाषण चर्चेत आले आहे. “बाळासाहेब थोरात हसले तरी लोकांना वाटते ते आपल्याकडेच पाहून हसले, यातून त्यांचे राजकारण सोपे होते.
मात्र, आपल्याला बाह्या वर केल्याशिवाय राजकारण करताच आले नाही,”अशी मिश्किल स्पष्टोक्ती माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी देताच एकच हशा पिकला.
खंडकरी चळवळीचे नेते माधवराव गायकवाड स्मृतिदिन व जन्मशताब्दी वर्षानिमित्त माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना मुरकुटे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे रहस्य उलगडले.
व्यासपीठावर उपस्थित आमदार थोरात यांच्याकडे पाहत मुरकुटे म्हणाले, “थोरात यांचे हसणे त्यांचे राजकारण सोपे करते, त्यांना कधीच बाह्या वर कराव्या लागल्या नाहीत. राजकारणात साम, दाम, दंड, भेद या गोष्टींचा वापर करावा लागतो.
मात्र, राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे आपल्याला राजकारणात यायचं असलं तरी दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली म्हणजे आगाऊपणा आणि दुसरी म्हणजे बाह्या वर करून दोन हात करणे. त्यामुळे आपण कायम बाह्या वर ठेवल्यामुळे राजकारणात टिकलो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
