शेजाऱ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाद होण्याच्या घटना ऐकिवात येत असतात. बऱ्याचदा शेजाऱ्यांची भांडणं विकोपाला जातात आणि काही तरी वाईट घडून जातं.
आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे. लग्न करून वधूला घेऊन परतलेल्या वरावर चाकूने हल्ला केला. या घटनेत खूप जण जखमीही झाले आहेत. लग्नाआधीच वादाला तोंड फुटलं होतं; पण तेव्हा लोकांनी हस्तक्षेप केल्याने भांडण मिटलं; मात्र शेजाऱ्याने लग्नानंतर गाडी रस्त्यात उभी ठेवून भांडणाला निमंत्रण दिलं. परिणामी या ठिकाणी हाणामारी व चाकू हल्ला झाला आणि काही जणांना थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लग्नानंतर वधू घेऊन परत आलेला वर आणि त्याच्या पाच मित्रांवर शेजाऱ्यांनी चाकूने हल्ला केला. या घटनेत जखमी झालेल्या वराला आणि इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. हे प्रकरण सालोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोराही परिसरातलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल प्रजापती मंगळवारी (28 नोव्हेंबर) त्याच्या लग्नाची वरात घेऊन जात होता. त्या वेळी त्याचा शेजारी राहणाऱ्या राम आसरे याच्याशी वाद झाला. त्या वेळी लोकांनी हस्तक्षेप केला आणि राहुल लग्नाची वरात घेऊन लग्नस्थळी निघून गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (29 नोव्हेंबर रोजी) राहुल प्रजापती वधूला घेऊन घरी परतला तेव्हा घरासमोर धान भरलेली गाडी उभी होती. गाडी उभी असल्याने वधूला कारमधून खाली उतरता येत नव्हतं.
वर राहुल आणि इतर नातेवाईकांनी गाडी रस्त्यावर उभी ठेवल्याबद्दल आक्षेप घेतला. त्यानंतर राम आसरे आणि त्याच्यासोबतचे मित्र व नातेवाईक यांना राग आला. त्यांनी रागात राहुल व त्याच्या मित्रांशी भांडण केलं. इतकंच नाही तर मारहाणही झाली. या वेळी आरोपींनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वर राहुलसह सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासोबतच पोलीस जखमींचे जबाब घेत आहेत. चाकू हल्ल्याच्या या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण आहे.
