देशात नुकतंच पार राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. यात राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत.
काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु होणार का? अशी चर्चा होतेय. कारण काँग्रेसचा बडा चेहरा आता राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
आजच कमलनाथ आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस हायकमांड कमलनाथ यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. त्याचमुळे कमलनाथ आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव झाला. अशात कमलनाथ यांच्या नेतृत्वावर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याची माहिती आहे.
पराभवानंतर पक्षातील नेत्यांना भेटण्याऐवजी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याऐवजी कमलनाथ यांनी भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. त्यांच्या घरी जात त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं अभिनंदन केलं. कमलनाथ यांच्या या कृतीवर काँग्रेस हायकमांड कमलनाथ यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय.
