विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात (Nagpur) सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी नागपुरात युवक काँग्रेसचा (Youth Congress) मोठा मोर्चा विधान भवनावर धडकणार होता.
बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सर्व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे यला मिळाले. कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क होते. पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठिय्या आंदोलनावर सुरू केले.
यानंतर पोलिसांनी त्यांना चक्क उचलून नेले. पोलिसांनी नाना पटोले यांच्यासह 40 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, सरकार महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना लुटत आहे.
अटक होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी आरोप केले की, सध्याचे सरकार तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना बरबाद करण्याचं काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असतानाही महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना फक्त लुटलं, नोकऱ्या दिल्या नाहीत.
महाराष्ट्रात लाखो पदं खाली आहेत. कंत्राटी भरतीच्या नावाने हे तरुणांचे आयुष्य बदनाम करत आहेत. म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुण-तरुणींचा मोर्चा विधान भवनाच्या निघाला आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.
