नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठी घोषणा केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी केला. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल, राज्यातील नाही, असं म्हणत
संजय राऊत यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना फटकारलं. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही, जो निर्णय घेऊ शकेल, जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही. सातत्याने त्यांना दिल्लीला विचारावं लागतं. त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करु, आम्ही 23 जागा लढवणारच, असं संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या 25 जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने 25 नव्हे तर सर्व 48 जागा लढवाव्या. आम्ही मात्र आमच्या 23 जागा लढवण्यावर ठाम आहोत.
