देशात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपची लाट पुन्हा दिसून आली. पाच पैकी तीन राज्यात भाजपने विधानसभा निवडणुकीत कमळ फुलवलं. त्याचाच प्रत्यय म्हणून आता भाजपने लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली असून अनेक जण भाजपच्या वाट्यावर असल्याचं बोललं जात आहे.
यातच नांदेड येथील काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
प्रतापराव चिखलीकर म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १०० वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्ताने नांदेडमध्ये आले होते आणि त्यावेळी ते बोलतांना म्हणाले होते की, भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकण्यासाठी अनेक लोक लाईनीत उभे राहिले आहेत. त्यामध्ये त्यांनी नांदेडच्या काॅंग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख केला. १५० कोटीची थकबाकी अशोक चव्हाणांच्या साखरकारखान्याला सरकार देत आहेत. तर मग आपण लक्षात घेतलं पाहिजे तसेच अशोक चव्हाण यांच्यासाठी ते नवीन नाहीत. ते सत्तेसाठी येऊ शकतात. त्यांचं पक्षात स्वागत आहे.
दरम्यान, प्रतापराव चिखलीकर यांच्या या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुचक विधान देखील केलं आहे. आम्ही कुणाकडे जात नाही, पक्ष फोडायला जात नाही. पण कुणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे. असं बावनकुळे यांनी म्हटलंय. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडणार ? ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.
