दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर केजरीवाल यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाज आदमी पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे.
आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी एकामागून एक ट्वीट करत केजरीवाल यांच्या घरी ईडीची छापेमारी आणि त्यांच्या अटकेचा अंदाज लावला आहे. ईडी पथक उद्या म्हणजेच गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी पोहोचून त्यांना अटक करणार असल्याची माहिती आहे, असं खळबळजनक ट्वीट दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केलं आहे.
त्याचवेळी राज्यसभा खासदार आणि आप नेते संदीप पाठक यांनी देखील पोस्ट करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्या सकाळी ईडीकडून छापा टाकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय ‘आप’ नेते आतिशी यांनी देखील बुधवारी रात्री उशिरा ट्वीटवर एका पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांच्या घरी छापा पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
