साकूर वार्ताहर : युगपुरुष स्व.अशोकराव बाजीराव पा.खेमनर यांच्या जयंतीनिमित्त साकूर येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन वार – बुधवार दि. १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात आले असल्याची माहिती मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. पवन गंगाराम खेमनर यांनी दिली.
या रक्तदान शिबीराचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर यांच्यासह विविध मान्यवर असणार आहे.
रक्तदान शिबीरासाठी अर्पण ब्लड बँक संगमनेर यांचे सहकार्य लाभणार असून विशेषतः रक्तदान करणाऱ्यांना केशर आंब्याचे झाड वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून या रक्तदान शिबीरात साकूरसह पठारभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन डॉ पवन खेमनर यांनी केले आहे.
साकूर पठारभागातील कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. अशोकराव खेमनर यांचा वारसा साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर हे चालवत आहे. दरवर्षी स्व.अशोकराव खेमनर यांची जयंती विविध उपक्रम राबवून साजरी केली जाते. यावर्षीही विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या वतीने विविध उपक्रमांसह कार्यक्रमांचे आयोजन केले असून तशी जय्यत तयारी सुरू आहे.
१५ मार्च रोजी विद्या प्रबोधिनी प्रशालेत सकाळी स्व. अशोकराव खेमनर यांना अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच साकूर परिसरातील जिल्हा परिषद शाळा साकूर, उर्दू शाळा साकूर, शासकीय आश्रमशाळा साकूर, जिल्हा परिषद शाळा देवी पठार, जिल्हा परिषद शाळा जोगेपठार, जिल्हा परिषद शाळा हळदा वस्ती, जिल्हा परिषद शाळा चितळकर वस्ती, जिल्हा परिषद शाळा चिंचेवाडी, जिल्हा परिषद शाळा हिरेवाडी, जिल्हा परिषद शाळा जांभुळवाडी, जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी, जिल्हा परिषद शाळा तास्करवाडी, तसेच विद्या प्रबोधिनी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
तसेच गावातील महादेव मंदिर, शनि मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, सावता महाराज मंदिर, संत गोरोबा मंदिर, संत नामदेव महाराज मंदिर, गणपती मंदिर, बिरोबा मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, मारूती मंदिरांसह तसेच चर्च, बौद्ध विहार, मस्जिद ( उर्दू शाळा) या धार्मिक स्थळांची साफसफाई करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे.
