शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अवघ्या काही तासांमध्ये देणार आहेत. आज दुपारी 4 नंतर कधीही हा निकाल जाहीर होऊ शकतो.
त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. असे असतानाच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रती शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत अनुदान, अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय आणि ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
– राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता
(महिला व बालविकास)
– ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी
(ग्राम विकास विभाग)
– शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक 44 द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी
(वित्त विभाग)
– ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी
(वित्त विभाग )
– जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी
(दिव्यांग कल्याण विभाग)
– पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रु. 50 हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता
(ग्राम विकास विभाग)
– महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, 1999 लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार
(मदत व पुनर्वसन विभाग)
– राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी
(अन्न व नागरी पुरवठा)
– राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 आणि 11064 सहाय्यभूत पदे निर्माण करण्यास तसेच 5803 पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी
(विधी व न्याय विभाग)
