परभणीतून दुर्देवी घटना समोर आली आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील ६५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पाय पसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रामराव विठ्ठलराव रोकडे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
रामराव हे रात्री लघुशंकेसाठी घराबाहेरच्या विहीरीजवळ आले. मात्र त्यावेळी त्यांचा अचानक तोल गेला. त्यानंतर रामराव हे पाय घसरून विहिरीत पडले. रामराव विहिरीत पडल्याने मोठा आवाज आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना तात्काळ बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
रामराव यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाल्यानंतर तातडीने त्यांना परभणीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामराव यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे
