माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिर्डीतून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे काहीसे नाराज झाले होते. आता आपल्याला तिकीट मिळणार नाही याची खात्री त्यांना झाली.
त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आता त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळते का याची उत्सुकता आहे. सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध नाराजी वाढली आहे.
खासदार लोखंडेंऐवजी दुसरा उमेदवार द्या अशीही मागणी केली जात आहे. त्यामुळे लोखंडेंची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यात आता कांबळे यांची शिंदे गटात एन्ट्री झाल्याने उमेदवारीसाठी त्यांचा विचार होऊ शकते.
असे जर झाले तर सदाशिव लोखंडे यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे शिंदे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता नाकारत येत नाही. जर हे गणित प्रत्यक्षात उतरले तर शिर्डी मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध भाऊसाहेब कांबळे अशी लढत झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
