शिरूर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मतदारांच्या नावे बोगस व्यक्तीने मतदान करून स्वाक्षरी केल्याचं निदर्शनास आलं असून याविरोधात अमोल कोल्हे यांच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना जाब विचारला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करुन स्वाक्षरी केली. प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराने बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला.
राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील मतदान केंद्रातील धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. तर मतदान केंद्रात बोगस मतदानामुळे गोंधळ उडाला आहे. या प्रकरणी अमोल कोल्हेंच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना विचारला जाब विचारला आहे. बोगस मतदान होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा शंका उपस्थित केली जात आहे.
शिरूरशिवाय पुणे मतदारसंघातही बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावानेच मतदान केलं गेल्याचं समोर आलंय. याविरोधात आता पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद्र शिंदे यांनी चौकशीची मागणी केलीय. पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात बोगस मतदानाच्या या दोन प्रकारामुळे आता प्रशासनाला जाब विचारला जात आहे.
