लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच दिल्लीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी तुटल्याची घोषणा करण्यात आली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका आप स्वबळावर लढणार आहे.
काँग्रेससोबत केवळ लोकसभेत आघाडी होती, विधानसभेला नको अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. आपच्या आमदारांची दिल्लीत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
आमदारांच्या बैठकीनंतर आपचे संयोजक गोपाल राय यांनी म्हटलं की, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी नसेल. २०२५ च्या सुरुवातीला दिल्लीत विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि येणारी विधानसभा निवडणूक यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी असा निर्णय पक्षाने घेतला असल्याचं गोपाल राय यांनी सांगितले.
तसेच लोकसभा निवडणूक आम्ही प्रामाणिकपणे लढलो. मात्र विधानसभेला आम्हाला आघाडी नको. दिल्लीच्या जनतेला सोबत घेत आम्ही विधानसभेची लढाई लढू आणि जिंकू. आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने विधानसभेची निवडणूक लढेल असं गोपाल राय यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत दिल्लीत ७ मतदारसंघात आप आणि काँग्रेस आघाडीने उतरली होती. त्यातील ४ जागांवर आप आणि ३ जागांवर काँग्रेसनं उमेदवार उभे केले. मात्र दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेस-आम आदमी पक्षाच्या आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे निकालाच्या तिसऱ्याच दिवशी आप पक्षाने एकला चलो रे नारा दिला आहे.
